वारियाने कुंडल हले । डोळे मोडित राधा चाले ॥धृ॥
फणस गंभीर कर्दळी दाट । हाती घेऊनी सारंगी पाट ॥१॥
राधेला पाहूनी भुलले हरी । बैल दुहितो नंदाघरी ॥२॥
कृष्णाला पाहूनी भुलली चित्ता । घुसळण घुसळी डेरा रिता ॥३॥
मन मिळालेसे मना । एका भुललो जनार्दन ॥४॥