बालक आम्ही आज सान जरि शिल्पकार देशाचे
मिटलेल्या या बाळमुठीतच धन लपले लाखाचे ॥धृ०॥
आज लेखणी अमुच्या हाती
धडे गिरवितो घेउन पाटी
मुखी आमुच्या ’शुभं करोती’
पाढे अन् परवचे ॥१॥
बटुमूर्ती ही आज दिसे जरि
आम्ही शत्रुचे काळ संगरी
पराक्रमा हो अवनी अपुरी
सैनिक भारतभूचे ॥२॥
या स्वच्छंदी वातावरणी
गाऊ स्वातंत्र्याची गाणी
गगनालाही घालू गवसणी
जिंकू शिखर कीर्तीचे ॥३॥