HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कुसुमाग्रज|विशाखा संग्रह २|
शेवटचे पान तू उंच गडी राहसि
उषःकाल


’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.



27GOOG
उषःकाल

झाला उषःकाल राणी !

हिमबिंदु बिलगुनी फुलांना पानांना बसती

हलती हळु वार्‍यावरती

जोजवती जणु नवथर बाला ही बाळे चिमणी

झाला उषःकाल राणी !

निळवन्तीच्या फुलू लागल्या कळ्या कुंपणावरी

येउनि रात्रीच्या प्रहरी

परत जायचे विसरुनि गेल्या वनदेवी कोणी

झाला उषःकाल राणी !

माणिकमोत्यांची पायाशी घालुनि बरसात

बसे संन्यस्त पारिजात

वाहु लागला सुगंध वारा तो वातावरणी

झाला उषःकाल राणी !

वनराईतुनि उठू लागली करीत किलबिल ती

पाखरे, अन् गगनी जाती

सोन्याच्या दर्यात गल्बते जणु गोजिरवाणी

झाला उषःकाल राणी !

इन्द्रनील ओटीत घेउनी शिंपित भवताली

आली निर्झरिणी, आली

खळाळते खडकावर हंसापरी शुभ्र पाणी

झाला उषःकाल राणी !

किनारती कनकाच्या धारा उदयगिरीवरती

जगावर अभिनव ये कांती

समूर्त झाली महाकवींची काय दिव्य वाणी

झाला उषःकाल राणी !

स्वप्नांचा वा खजिना घेउनि लगबगिने रात्र

गेली, चुकोनिया मात्र

उषास्वप्न हे उरले मागे-तुजसाठी रमणी

झाला उषःकाल राणी !

Translation - भाषांतर

N/A
27GOOG
References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३७


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-25T00:49:28.6000944Z

Comments | अभिप्राय