HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कुसुमाग्रज|विशाखा संग्रह २|
प्रकाशप्रभु
मेघास


’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.



56
मेघास

थांब थांब परतु नको रे घना कृपाळा,

अजुनि जाळतोच जगा तीव्र हा उन्हाळा !

अजुनि पायि भासतात पसरले निकारे

उसळतात अजुनि गगनि पेटलेच वारे

मरुनि पडत तरुवरुनी पाखरे तळाला !

तगमगुनी टाकितसे भूमि ही उसासे

शून्य ह्रदय होत नदी हसत विकट भासे

रखरखती दाहि दिशा उफळतात ज्वाळा !

हतभागी दिसत तरू जाळत्या उन्हाने

पायाशी पडलेली गळुनि दग्ध पाने

आशा जणु पिचलेल्या लगटती जिवाला !

बांधावर बसुनि नजर बांधुनि आकाशी

तडफडती गाइगुरे पाहुनी उपाशी

शेतकरी बैसे कर लावुनी कपाळा !

गर्जत ये, ओढित ये आसुड तडितेचा

गर्वोन्नत माथा तो नमव भास्कराचा

लोकाग्रणि नमवि जसा मातल्या तृपाळा !

Translation - भाषांतर

N/A
56
References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३३


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-25T01:20:35.1740960Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us