HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
जीवनसंगीत लोकमान्यांस
मग विसर हवा तर हा क्षण गे !


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



18GOOG
मग विसर हवा तर हा क्षण गे !

मग विसर हवा तर हा क्षण गे !

क्षण हाच जवळ ये तूं पण गे ! ध्रु०

अनंत जन्मांचें शुभ संचित

क्षणीं याच गे होवो कुसुमित,

स्वर्गपणा या क्षणास आणुत,

ये परिस मूक मम भाषण गे. १

सूर्य, चंद्र, सारे तारकगण,

यक्ष, देव, दानव, सारेजण,

क्षणा याच देवोत सैरपण,

थांबवोनि वळवळ वणवण गे. २

पूर्ण विश्वलयिं अति एकांतीं

तुझी ज्योति पसरो स्थिर, कांती

मिळो त्यांत मम, फिटुनी भ्रांती,

ये करुं दे आत्मसमर्पण गे ! ३

हो ध्रुव धरणी चरणाखालीं,

वितळुनि जावो नच पाताळीं

तुझि माझी जों ग्रंथि न झाली;

मग उधळो तीचा कण कण गे ! ४

Translation - भाषांतर

N/A
18GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - नववधू

राग - कानडा

ठिकाण - प्रतापगढ

दिनांक -८ सप्टेंबर १९२०


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-13T07:37:20.8723936Z

Comments | अभिप्राय