HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी आणि कविता|भा.रा.तांबे|02|
मरणांत खरोखर जग जगतें गाडी बदलली
उदार चंद्रा !


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



29
उदार चंद्रा !

उदार चंद्रा, तुला नमुनि मी मार्ग धरीं आपुला. ध्रु०

शतदा आतां घालीं फेरी,

त्रिलोकगामी दृष्टि रुपेरी

दिशादिशांतुनि टाकुनि हेरीं,

तुज न दिसें प्रेमला ! १

सागरतळिं रे कर खुपसोनी

ह्रद्गत ओढीं वर चेववुनी;

वार्ता न मिळे माझी फिरुनी,

पूस जागवुनि जला. २

नदीतटीं कीं सागरतीरीं,

दिङ्‌मृगजलिं वा व्योमसरोवरिं,

कालपुलिनिं वा अफाट हेरीं,

बघशि न या पाउलां ३

तरुणतरुणि तूं सहस्त्र बघशिल,

ज्वाला त्यांच्या उरिं भडकविशिल,

वेलिवायुसा त्यां हालविशिल,

नच स्पर्शशिल मला. ४

कमलवनीं वायूस निमंत्रुनि

मज्लस भरवुनि मद्य पाजुनी

कळ्या हसव गुदगुल्या करोनी,

हासविशिल नच मला. ५

Translation - भाषांतर

N/A
29

कवी - भा. रा. तांबे

जाति - सृष्टिलता

राग - यमनकल्याण

ठिकाण - अजमेर

दिनांक - २३ ऑगस्ट १९२१


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-13T09:59:03.5886992Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us