HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
उडाला हंस ते कांत यापुढें
नदितिरीं उभी ती


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



21GOOG
नदितिरीं उभी ती

नदितिरीं उभी ती दाट तृणीं,

आर्द्र वस्त्र ठिबके चरणीं. ध्रु०

नयन नभीं, कर दोन्ही जुळले;

केशपाश उरिं पाठीं रुळले;

तुफान ह्रदयीं घोर उसळलें;

ही पसरे छाया मुखिं नयनीं. १

बघति तुंगगिरि घेरा घालुनि,

थिजले तरुवर तिला पाहुनी,

स्थिरावले ढग पळतां गगनीं,

डोकावि बालरवि ढगांतुनी. २

असह्य छळ ज्यांस्तव सोशियला,

तेच निघाले टाकुनि मजला,

नभ कोसळलें, हाय कपाळा,

परि दुभंगे न देवा, धरणी ! ३

कोण कुणाचें जगतीं देवा ?

कोण दीर रे ? कोण सासवा ?

कुठला मायेचा ओलावा ?

गांजिलें भाजिलें दिनरजनीं !

म्हणति मींच कीं त्यांना गिळिलें,

करंटीच अवदसा जन्मलें,

खरेंच का हें देवा, सगळें ?

मग नको दावणें मुख फिरुनी ! ५

डोईवर चिमण्यांची पाटी,

पैसा अडका एक न गांठीं,

कोण पृथ्विच्या अफाट पाठीं ?

मग काय करिन तरि मी जगुनी ? ६

पिलें अर्पितें तुझिया चरणां

दयाघना, तुज त्यांची करुणा,

फुटेल पान्हा तुजविण कवणा ?

त्यां तूच माय, तूं बाप जनीं. ७

मायपोट तूं गंगामाई;

अगाध माया तुझिया ठायीं;

आल्यें धावत तुझिया पायीं;

दे ठाव तुझ्या डोहीं गहनीं ! ८

तुझा डोह मज महाल आई,

मऊ बिछाना तव तळ बाई;

करिल तुझा ध्वनि मज अंगाई,

किति शांत झोप येइल मरणीं !

उडी घालण्या टाकी चरणा,

विदारुनी तों वातावरणा

हंबरडा तो आला श्रवणां-

'गे आइ आइ ! जाशी त्यजुनी ! !' १०

ऐकुनि ती व्याकुळ किंकाळी

मटकन माउलि बसली खालिं;

निश्चय ढळला तो तत्कालीं,

हो ह्रदयाचें पाणि पाणी ! ११

घे ओढुनि पोटीं वत्सांला,

मोलमजूरी करीन बाळा,

भिक्षा मागिन रे वेल्हाळा !

परि भरीन हीं तोडें चिमणीं ! १२

Translation - भाषांतर

N/A
21GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - नववधू

राग - जोगी

ठिकाण -लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - २३ ऑगस्ट १९२६


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-14T06:34:14.0461728Z

Comments | अभिप्राय