श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ
१
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥ २॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा ।
द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४॥
२
चहूं वेदीं जाण षट्शास्त्रीं कारण ।
अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २॥
एक हरि आत्मा जीवशिव सम ।
वायां दुर्गमी न घालीं मन ॥ ३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥ ४॥
३
त्रिगुण असार निर्गुण हें सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥ १॥
सगुण निर्गुण गुणांचें अगुण ।
हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २॥
अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार ।
जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४
४
भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति ।
बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ १॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।
उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ १॥
सायासें करिसी प्रपञ्च दिननिशीं ।
हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें ।
तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४॥
५
योग याग विधी येणें नोहे सिद्धि ।
वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १॥
भावेंवीण देव न कळे निःसंदेह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २॥
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३॥
ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४॥
६
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला ।
ठायींच मुराला अनुभवें ॥ १॥
कापुराची वाती उजळली ज्योती ।
ठायींच समाप्ती झाली जैसी ॥ २॥
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला ।
साधूचा अंकिला हरिभक्त ॥ ३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं ।
हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं ॥ ४॥
७
पर्वताप्रमाणें पातक करणें ।
वज्रलेप होणें अभक्तांसी ॥ १॥
नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त ।
हरीसी न भजत दैवहत ॥ २॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्यां कैंचा दयाळ पावे हरी ॥ ३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥ ४॥
८
संतांचे संगती मनोमार्गगती ।
आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ १॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप ॥ २॥
एकतत्त्वी नाम साधिती साधन ।
द्वैताचें बंधन न बाधिजे ॥ ३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली ।
योगियां साधली जीवनकळा ॥ ४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्णदाता ॥ ५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६॥
९
विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।
रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ॥ १॥
उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा ।
रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥ २॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचें ॥ ४॥
१०
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं ।
चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥ १॥
नामासी विन्मुख तो नर पापिया ।
हरीविण धांवया न पावे कोणी ॥ २॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
नामें तिन्ही लोक उद्धरती ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें ।
परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥ ४॥
११
हरिउच्चारणीं अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रें ॥ १॥
तृण अग्निमेळें समरस झालें ।
तैसें नामें केलें जपता हरी ॥ २॥
हरिउच्चारण मंत्र पैं अगाध ।
पळे भूतबाधा भय याचें ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥ ४॥
१२
तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी ।
वायांची उपाधी करिसी जनां ॥ १॥
भावबळें आकळे येरवी नाकळे ।
करतळीं आंवळे तैसा हरी ॥ २॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी ।
यत्न परोपरी साधन तैसें ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥ ४॥
१३
समाधि हरीची सम सुखेंवीण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥ १॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें ।
एका केशवराजे सकळ सिद्धि ॥ २॥
ऋद्धि सिद्धि अन्य निधि अवघीच उपाधी ।
जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥ ३॥
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान ।
हरीचें चिंतन सर्वकाळ ॥ ४॥
१४
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥ १॥
रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप ।
पापाचे कळप पळती पुढें ॥ २॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पाविजे उत्तम निज स्थान ॥ ४॥
१५
एक नाम हरि द्वैतनाम दूरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १॥
समबुद्धि घेतां समान श्रीहरी ।
शमदमां वरी हरि झाला ॥ २॥
सर्वांघटी राम देहादेहीं एक ।
सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥ ३॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥ ४॥
१६
हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।
वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥ १॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली ।
तयासी लाधली सकळ सिद्धि ॥ २॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले ।
प्रपंची निमाले साधुसंगे ॥ ३॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा ।
तेणें दशदिशा आत्माराम ॥ ४॥
१७
हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥ १॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥ २॥
मतृपितृभ्रात सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥ ३॥
ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें ।
निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥ ४॥
१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणे कोणी ॥ १॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें ।
सकळही घडलें तीर्थाटण ॥ २॥
मनोमार्गें गेला तो तेथें मुकला ।
हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥ ३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥ ४॥
१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ॥ १॥
अनंत जन्मांचें तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठी ॥ २॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठी ॥ ३॥
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म ।
हरीविण नेम नाहीं दुजा ॥ ४॥
२०
वेदशास्त्रपुराण श्रुतीचें वचन ।
एक नारायण सारा जप ॥ १॥
जप तप कर्म हरीविण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥ २॥
हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥ ३॥
ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र ।
यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥ ४॥
२१
काळ वेळ नाम उच्चारितां नाहीं ।
दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥ १॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण ।
जडजीवां तारण हरि एक ॥ २॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची ।
उपमा त्या देवाची कोण वानी ॥ ३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ।
पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥ ४॥
२२
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ ।
लक्षुमीवल्लभ तयां जवळी ॥ १॥
नारायण हरी नारायण हरी ।
भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥ २॥
हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड ।
गगनाहूनि वाड नाम आहे ॥ ४॥
२३
सात पांच तीन दशकांचा मेळा ।
एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १॥
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ ।
तेथें कांहीं कष्ट न लागती ॥ २॥
अजपा जपणें उलट प्राणाचा ।
येथेंही मनाचा निर्धार असे ॥ ३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ ।
रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥ ४॥
२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥ २॥
जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात ।
भजकां त्वरित भावनायुक्त ॥ ३॥
ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४॥
२५
जाणीव नेणीव भगवंतीं नाही ।
हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १॥
नारायण हरी उच्चार नामाचा ।
तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥ २॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
तें जीवजंतूंसीं केवीं कळे ॥ ३॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥ ४॥
२६
एक तत्त्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसी करुणा येईल तुझी ॥ १॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधीं ॥ २॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
वायां आणि पंथा जाशी झणी ॥ ३॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४॥
२७
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी ।
रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ १॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरीविण ॥ २॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे ॥ ३॥
निजवृत्ति हे काढी माया तोडी ।
इंद्रियांसवडी लपूं नको ॥ ४॥
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करीं ॥ ५॥
२८
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस ।
रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥ १॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं ।
होय अधिकारी सर्वथा तो ॥ २॥
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन ।
उल्हासें करून स्मरण जीवी ॥ ३॥
अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं ।
हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥ ४॥
संतसज्जनानीं घेतली प्रचीती ।
आळशी मंदमती केवीं तरें ॥ ५॥
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ ।
तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥ ६॥
२९
कोणाचें हें घर हा देह कोणाचा ।
आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥ १॥
मी तूं हा विचार विवेक शोधावा ।
गोविंदा माधवा याच देहीं ॥ २॥
देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा ।
सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती ।
या नावें रूपें तुम्ही जाणा ॥ ४॥
Translation - भाषांतर
N/A