श्री एकनाथ महाराज हरिपाठ
१
हरीचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥
हरी मुखीं गातां हरपली चिंता ।
त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे ।
तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥
हरिरूप झालें जाणीव हरपले ।
मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं ।
एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
२
हरि बोला हरि बोला नातरी अबोला ।
व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥
नको अभिमान नको नको मान ।
सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥
सुखी त्याणें व्हावें जगा निववावें ।
अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥
मार्ग जया कळे भावभक्तिबळें ।
जगाचिये मेळे न दिसती ॥४॥
जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं ।
एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
३
ओळखिला हरी धन्य तो संसारी ।
मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ॥१॥
सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे ।
नेलें राजहंसें पाणी काय ॥२॥
काय तें करावें संदेहीं निर्गुण ।
ज्ञानानें सगुण ओस केलें ॥३॥
केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें ।
उपजले मेले ऐसे किती ॥४॥
एका जनार्दनीं नाहीं यातायाती ।
सुखाची विश्रांती हरीसंगें ॥५॥
४
जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप ।
पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव ।
तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥
वैष्णवांचें गुह्य मोक्षांचा एकांत ।
अनंतासी अंत पाहतां नाहीं ॥३॥
आदि मध्य अवघा हरि एक ।
एकाचे अनेक हरि करी ॥४॥
एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही ।
एका जनार्दनीं ऐसें केलें ॥५॥
५
नामाविण मुख सर्पाचें तें बीळ ।
जिव्हा काळसर्प आहे ॥१॥
वाचा नव्हे लांब जळो त्याचें जिणें ।
यातना भोगणें यमपुरीं ॥२॥
हरीविण कोणी नाहीं सोडविता ।
पुत्र बंधु कांता संपत्तिचे ॥३॥
अंतकाळीं कोणी नाहीं बा सांगाती ।
साधूचे संगतीं हरी जोडे ॥४॥
कोटि कुळें तारी हरि अक्षरें दोन्ही ।
एका जनार्दनीं पाठ केलीं ॥५॥
६
धन्य माय व्याली सुकृताचें फळ ।
फळ निर्फळ हरीविण ॥१॥
वेदांताचें बीज हरि हरि अक्षरें ।
पवित्र सोपारें हेंचि एक ॥२॥
योग याग व्रत नेम दानधर्म ।
नलगे साधन जपतां हरि ॥३॥
साधनाचें सार नाम मुखीं गातां ।
हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी ॥४॥
नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी ।
एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
७
बहुतां सुकृतें नरदेह लाधला ।
भक्तीविण गेला अधोगती ॥१॥
पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म ।
न कळेचि वर्म अरे मूढा ॥२॥
अनंत जन्मींचें सुकृत पदरीं ।
त्याचे मुखीं हरि पैठा होय ॥३॥
राव रंक हो कां उंच नीच याती ।
भक्तीविण माती मुखीं त्याच्या ॥४॥
एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां ।
मुक्ती सायुज्यता पाठी लागे ॥५॥
८
हरिनामामृत सेवी सावकाश ।
मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥१॥
नित्य नामघोष जयाचे मंदिरीं ।
तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥
वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे ।
अविनाशासी पाहे नाश कैचा ॥३॥
एका तासामाजीं कोटि वेळा सृष्टी ।
होती जाती दृष्टि पाहें तोचि ॥४॥
एका जनार्दनीं ऐसें किती झालें ।
हरिनाम सेविलें तोचि एक ॥५॥
९
भक्तीविण पशु कशासी वाढला ।
सटवीने नेला कैसा नाहीं ॥१॥
काय माय गेली होती भूतापासीं ।
हरि न ये मुखासी अरे मूढा ॥२॥
पातकें करिता पुढें आहे पुसता ।
काय उत्तर देतां होशील तूं ॥३॥
अनेक यातना यम करवील ।
कोण सोडवील तेथें तुजला ॥४॥
एका जनार्दनीं सांगताहें तोंदें ।
आहा वाचा रडे बोलतांचि ॥५॥
१०
स्वहिताकारणें संगती साधूची ।
भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥
हरि तेथें संत संत तेथें हरी ।
ऐसें वेद चारी बोलताती ॥२॥
ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे ।
तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥
वेदार्थाचा गोंवा कन्याभिलाष ।
वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥
वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी ।
एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
११
सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया ।
आनंदपदीं जया म्हणती हरी ॥१॥
सत्पद निर्गुण चित्पद सगुण ।
सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥
तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी ।
गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥
हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी ।
अभिमानियांसी नर्कवास ॥४॥
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनी ।
एका जनार्दनीं तेंचि झालें ॥५॥
१२
नाकळे तें कळे कळे तें नाकळे ।
वळे तें ना वळें गुरुविणें ॥१॥
निर्गुण पावलें सगुणीं भजतां ।
विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२॥
बहुरूपी घरी संन्यासाचा वेष ।
पाहोन तयास धन देती ॥३॥
संन्याशाला नाहीं बहुरूपियाला ।
सगुणीं भजला तेथें पावे ॥४॥
अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं ।
एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
१३
ओळखिला हरि सांठविला पोटीं ।
होतां त्याची भेटी दुःख कैंचें ॥१॥
नर अथवा नारी हो कां दुराचारी ।
मुखीं गातां हरि पवित्र तो ॥२॥
पवित्र तें कुळ धन्य त्याची माय ।
हरि मुखें गाय नित्य नेमें ॥३॥
काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं ।
नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥४॥
वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी ।
एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
१४
हरि बोला देतां हरि बोला घेतां ।
हांसतां खेळतां हरि बोला ॥१॥
हरि बोला गातां हरि बोला खातां ।
सर्व कार्य करितां हरि बोला ॥२॥
हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं ।
देहत्यागांतीं हरि बोला ॥३॥
हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां ।
उठतां बैसतां हरि बोला ॥४॥
हरि बोला जनीं हरि बोला विजनीं ।
एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
१५
एक तीन पांच मेळा पञ्चवीसांच ।
छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ॥१॥
कल्पना अविद्या तेणे झाला जीव ।
मायोपाधी शिव बोलिजेति ॥२॥
जीव शिव दोन्ही हरिरूपीं तरंग ।
सिंधु तो अभंग नेणें हरी ॥३॥
शुक्तीवरी रजत पाहतां डोळां दिसे ।
रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ॥४॥
क्षेत्र\-क्षेत्रज्ञातें जाणताती ज्ञानी ।
एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
१६
कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा ।
तेणें पडे गोंवा नेणे हरी ॥१॥
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची ।
इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥
इच्छावे ते जवळी चरण हरीचे ।
चरण सर्व नारायण देतो तुज ॥३॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी ।
घेतां जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥
एका जनार्दनीं सांपडली खूण ।
कल्पना अभिमान हरि झाला ॥५॥
१७
काय पद्मनीचे षंढासी सोहळे ।
वांझेसी दोहाळे कैची होती ॥१॥
अंधापुढें दीप खरासी चंदन ।
सर्पासी दुधपान करूं नये ॥२॥
क्रोधि अविश्वासी त्यासी बोध कैंचा ।
व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ॥३॥
खळाची संगती उपयोगासी न ये ।
आपणा अपाय त्याचे संगे ॥४॥
वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी ।
एका जनार्दनीं तेचि भले ॥५॥
१८
न जायेचि ताठा नित्य खटाटोप ।
मण्डुकीं वटवट तैसे ते गा ॥१॥
प्रेमावीण भजन नाकाविण मोती ।
अर्थाविण पोथी वाचुनी काय ॥२॥
कुंकवा नाहीं ठावे म्हणे मी आहेव ।
भावावीण देव कैसा पावे ॥३॥
अनुतापेवीण भाव कैसा राहे ।
अनुभवें पाहें शोधूनियां ॥४॥
पाहतां पाहणें गेलें तें शोधूनी ।
एका जनार्दनीं अनुभविलें ॥५॥
१९
परिमळ गेलिया वोस फुल देठीं ।
आयुष्या शेवटीं देह तैसा ॥१॥
घडीघडी काळ वाट याची पाहे ।
अजून किती आहे अवकाश ॥२॥
हाचि अनुताप घेऊन सावध ।
कांहीं तरी बोध करीं मना ॥३॥
एक तास उरला खट्वांग रायासी ।
भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥४॥
सांपडला हरि तयाला साधनीं ।
एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
२०
करा रे बापांनो साधन हरीचें ।
झणीं करणीचें करूं नका ॥१॥
जेणें बा न ये जन्म यमाची यातना ।
ऐशिया साधना करा कांहीं ॥२॥
साधनाचें सार मंत्रबीज हरी ।
आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥३॥
कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम ।
एक हरि नाम जपतां घडे ॥४॥
एका जनार्दनीं न घ्यावा संशय ।
निश्चयेंसी होय हरिरूप ॥५॥
२१
बारा सोळा जणी हरीसी नेणती ।
म्हणोनी फिरती रात्रंदिवस ॥१॥
सहस्र मुखांचा वर्णितां भागला ।
हर्ष जया झाला तेणें सुखें ॥२॥
वेद जाणूं गेला पुधें मौनावला ।
तें गुह्य तुजला प्राप्त कैंचें ॥३॥
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा ।
दास सद्गुरूचा तोचि जाणे ॥४॥
जाणते नेणते हरीचे ठिकाणीं ।
एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
२२
पिंडीं देहस्थिती ब्रह्मांडीं पसारा ।
हरिविण सार व्यर्थ भ्रम ॥१॥
शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी ।
हरिसी जाणोनि हरिच झाले ॥२॥
या रे या रे धरूं हरिनाम तारूं ।
भवाचा सागरू भय नाहीं ॥३॥
साधुसंत गेले आनंदीं राहिले ।
हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥
एका जनार्दनीं मांडिलें दुकान ।
देतो मोलावीण सर्व वस्तु ॥५॥
२३
आवडीनें भावें हरिनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा ।
पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ ।
तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥
जैसी स्थिति आहे तैशापरी राहें ।
कौतुक तूं पाहें संचिताचें ॥४॥
एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपें त्याचा नाश झाला ॥५॥
२४
दुर्बळाची कन्या समर्थाने केली ।
अवदसा निमाली दरिद्राची ॥१॥
हरिकृपा होतां भक्तां निघती दोंदें ।
नाचती स्वानंदें हरिरंगीं ॥२॥
देव भक्त दोन्ही एकरूप झाले ।
मुळींच संचलें जैसें तैसें ॥३॥
पाजळली ज्योती कापुराची वाती ।
ओवाळितां आरती भेद नुरे ॥४॥
एका जनार्दनीं कल्पेंची मुराला ।
तोचि झाला ब्रह्मरूप ॥५॥
२५
मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष ।
तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥
कानीं जें पेरिलें डोळां तें उगवलें ।
व्यापकें भारले तोचि हरि ॥२॥
कर्म-उपासना-ज्ञानमार्गीं झाले ।
हरिपाठीं आले सर्व मार्ग ॥३॥
नित्य प्रेमभावें हरिपाठ गाय ।
हरिकृपा होय तयावरी ॥४॥
झाला हरिपाठ बोलणें येथूनी ।
एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
Translation - भाषांतर
N/A